सुगावा मिश्र विवाह मंडळाची भूमिका

आपला भारतीय समाज हा अनेक जाती, धर्म, पंथ यात विभागलेला आहे. तो एकसंघ नाही. ही भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडचण आहे. त्या करिता जाति-निर्मूलनाची चळवळ आवश्यक आहे, असे आम्ही मानतो. आपल्याकडे विवाह जातीमध्ये बंदिस्त असलेला, जातीचा, धर्माचा प्रभाव असलेला संस्कार आहे. या परंपरेमध्ये हुंडा, पत्रिका असले कर्मकांडं सुद्धा आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे जून महिन्यात मुंबईत कांदिवली येथे राहणा-या तिन बहिणींना लग्न रखडल्याने नैराश्य येउन आत्महत्या केली. ही घटना म्हणजे आपल्या धर्म, जाती व्यवस्थेचा व परंपरेचा पराजय आहे. म्हणून जात-धर्म, यांचा प्रभाव किमान लग्नापुरता नाहीसा करण्याचा प्रयत्न करणे हीच आमची भूमिका आहे.

संस्थेची सुरूवात :  १९८१ या वर्षी पुणे येथे “जाती-निर्मूलन संस्थेचे” संस्थापक शिरुभाऊ लिमये यांनी ” आंतरजातीय विवाह आणि सामाजिक परिवर्तन” या विषयावर उहापोह करण्यासाठी तरूण कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यातून “समाज-परिवर्तनासाठी आंतरजातीय विवाह” ही पुस्तिका प्रकाशित झाली. त्या पुस्तिकेवरून प्रदर्शन निर्माण केले गेले. ते प्रदर्शन पाहण्याचा योग आला. मी निवृत्त झाल्यावर काय करावे हेही तिथेच ठरले. प्रथम त्या प्रदर्शनाची प्रतिकृती मी बनवून घेतली. पुस्तिकेची विक्री, प्रदर्शन, व विवाहेच्छूचे मेळावे असे कार्यक्रम ठिकठिकाणी घेतले, ते “सुगावा मिश्र विवाह मंडळा”च्या छत्राखाली. पुण्यातही अशी संस्था चालविणारे प्रा. विलास वाघ, व उषा वाघ यांनी ही मला मार्गदर्शन केले व कामाला म्हणजे विवाहेच्छूंची नोंदणी करायला सुरूवात केली व मला पूर्ण वेळ काम मिळाले.

नियम, अटी, बंधने : हुंडा देणार नाही -घेणार नाही, पत्रिका पाहणार नाही, जात विचारात आणणार नाही या आमच्या प्रमुख अटी आहेत. आम्ही एकदाच नोंदणी करताना रू. ५० घेतो, लग्न जमल्या वर काहीही घेत नाही.

कामाची पद्धत : आम्ही विवाहेच्छूंची नोंदणी करतो, संस्थेच्या फ़ॊर्म वर त्यांचा पूर्ण तपशील नोंदवून ….. विवाहेच्छू तरूण तरूणींना बोलावून त्यांच्या अपेक्षा, जाणिवा यांची माहिती करून घेतली जाते, परिचय मेळावे आयोजित केले जातात, मान्यवरांना बोलावून त्यांच्याशी चर्चा घडवून आणली जाते, यांतूनच आंतरजातीय विवाह आणि तत्सम जबाबदारीची जाणिव त्यांना होते.

कामामागील हेतू : या मागचा आमचा आणखी एक हेतू म्हणजे केवळ आंतरजातीय विवाह करण्याची इच्छा असणे, इतकेच पुरेसे नाही. अशा विवाहाने एकत्र येणा-या दांपत्यांना एकमेकांच्या आवडी-निवडी, खाण्या-पिण्याच्या सवयी, अन्य सवयी व संस्कार आदीमध्ये भिन्नता असते. त्यासाठी एकमेकांना समजून घेणे आणि समजावून देणे महत्त्वाचे असते त्यादृष्टीने त्यांना मार्गदर्शन केले जाते, किंबहुना या सर्व माहितीच्या आधारावर लग्न जुळविणा-या आमचा प्रयत्न असतो. शिवाय मेळावे, प्रदर्शन, निबंध स्पर्धा याद्वारे आमचे प्रबोधनाचे काम चालू असते.

बंधने : लग्न जमल्यावर आम्ही ते नोंदणी पद्धतीने व्हावे असा आमचा प्रयत्न असतो. तसेच खर्चिक उधळपट्टी टाळावी. समारंभ फार मोठा न करता घरगुती पातळीवर करावे असे समजावतो. परंतु टोकाचा आग्रह धरीत नाही. कारण हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडून पत्रिका न पाहता आंतरजातीय विवाह होतोय हेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. आम्ही अशा वेळी सुद्धा आग्रही भूमिका घेतली तर अशा व्यक्ती समाजापासून तुटण्याचा ्धोका असतो. असे सामाजिक बदल करताना एकाकी पडून चालणार नाही.

विवाहितांना मदत : प्रेमाने असो किंवा ध्येयाने, आंतरजातीय विवाह जुळला असेल अशा सुरूवातीच्या काळात पालक काही वेळा कडवटपणे वागतात. अशा काळात त्यांना आधार देणे, त्यांच्याबरोबर राहाणे महत्त्वाचे असते. संस्थेतून विवाह झालेले व संस्थेचे कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबिय अशावेळी त्यांची सोबत करतात. शिवाय आंतरजातीय विवाह आमच्याकडून झालेले असो वा नसो अशा विवाहांचे आम्ही जाहीर अभिनंदन करतो व त्यांच्या अभिनंदनाची पत्रे समाजातील काही मान्यवरांना व सामाजिक कार्यकर्त्यांना पाठवितो व त्यांना अशा विवाहितांचे अभिनंदन करायला सांगतो. त्यामुळे विवाहितांना एकाकी वाटत नाही तर संपूर्ण समाज आपल्या बाजूने आहे, असे त्यांना जाणवते.

सभासदांची नोंदणी : आमच्याकडे १. आंतरजातीय विवाहाचे महत्त्व पटलेली २. मागच्या पिढीत आंतरजातीय विवाह केलेल्यांची मुले ३. समाजाच्या प्रथेप्रमाणे हुंडा, मानपान खर्च न झेपणारी ४. वयामुळे लग्न न जमणारी ५. घटस्फोटीत ६. विधवा-विधूर आदी विविध प्रकारच्या व्यक्ती आमचेकडे येतात. केवळ परिस्थितीमुळे आंतरजातीय विवाह करणा-यांचा आग्रह शक्यतो वरच्या जातींचा असतो. आपल्यापेक्षा उच्च जात ब-याच जणांना हवी असते. आम्ही जातीपेक्षा व्यक्तीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो. दलित-सुवर्ण, हिंदू-मुस्लिम, मुसलमान-ख्रिश्चन असे विवाह कमी होतात, तसे व्हावेत असा आमचा प्रयत्न असतो. यापूर्वी चांभार-वैश्य वाणी, खाटीक-ओबीसी, रजपूत-मुसलमान, मुसलमान-मराठा असे विवाह आम्ही जुळविले आहेत. शिवाय एकाच कुटुंबातील भावंडाचीही आंतरजातीय विवाह जमविले गेले आहेत, शिवाय नासिक-मुंबई, मुंबई-पुणे, मुंबई-इंदोर असे विवाह आम्ही जमविले आहेत.

आतापर्यंत विवाह झालेल्यांचे अनुभव : गेल्या दहा वर्षात चाळीस विवाह आमच्या मंडळाने जमविले. ते सर्व सफल झाले आहेत. त्या सर्वांशी संस्थेचे आजही जवळचे संबंध आहेत. या सर्वांचा एकमेकांशी परिचय व्हावा म्हणून मंडळाच्या दहाव्या वर्धापनदिना निमित्ताने एकत्र आली. त्यांच्यातील काही दांपत्यांनी “सुगावा परिवार”ची निर्मिती केली. अनेक आंतरजातीय व आंतर-धर्मीय विवाहीत दांपत्ये ह्या सुगावा परिवाराचे सभासद आहेत.

केवळ विवाह जमविल्यावर आमचे काम संपले असे आम्ही मानत नाही. त्यांच्या लग्नानंतर आमची जबाबदारी वाढते. पती-पत्नी मध्ये बेबनाव होऊ नये, त्यांची संबध सुरळीत असावेत हे आम्ही महत्त्वाचे मानतो. अशी लग्ने म्हणजे सामाजिक आव्हांन असते, ते सफल व्हावे यासाठी सततच्या संपर्कातून काळजी घेतो.

कुटुंबाचा सहभाग आणि सहकारी : माझ्या सर्व मुलांची आंतरजातीय विवाह झाले आहेत. पैकी दोन लग्ने सुगावामार्फत जमली आहेत. माझ्या कुटुंबातील सर्वांनीच मला नेहमीच सहकार्य केले आहे. तसेच सुरूवातीपासून डॊ. सुधा कावतकर, हेमंत नि-हाळी यांची मदत नेहमीच झाली. अलिकडे पुष्पा नागोरी, प्रफुल्लता दळवी, जीवराज सावंत, उन्मेष बागवे, त्यांची पत्नी जुई यांचेही सहकार्य मिळत आहे.

सामाजिक जाणीवा जागृत करण्यासाठी आंतरजातीय विवाह हे आमचे ध्येय आहे. मला सहकार्य करणारे सर्व तरूण-तरूणींनी स्वतः आंतरजातीय / आंतर-धर्मीय विवाह केले आहेत. धन्यवाद …..

( हा लेख आप्पा रेडीज यांच्या आकाशवाणी वरील मुलाखतीवर , १० नोव्हेंबर १९९८ , आधारीत आहे )

संजीव साने यांना निळू फुले सन्मान

सुगावा परिवार चे हितचिंतक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, समाजवादी जन परिषद या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, साने गुरूजी स्मारकाचे कार्याध्यक्ष आमचे मित्र श्री संजीव साने यांना पहिला निळू फुले सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल सुगावा परिवार तर्फे हार्दिक अभिनंदन ….

ज्येष्ठ अभिनेते आणि विचारवंत निळू फुले यांच्या कुटुंबीयांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या निळू फुले सन्मानाचे मानकरी ठरले आहेत लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर, संजीव साने आणि कलाकार-कवी किशोर कदम. निळू फुले यांचा वावर केवळ चित्रपट-नाटक या क्षेत्रांपुरताच नव्हता, तर सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील चळवळींशीही ते जोडलेले होते. लोककलेशी आणि कलापथकाशी त्यांची अखेरपर्यंत जवळिक होती. म्हणून त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी लोककला, समाजकार्य आणि सिनेनाट्य ही तीन क्षेत्रे निवडण्यात आली आहेत. यमुनाबाई वाईकरांचे नाव लोकनाट्याच्या प्रांतात सर्वपरिचित आहे. खुद्द निळूभाऊंना यमुनाबाईंच्या अदाकारीविषयी व त्यांच्या कष्टाविषयी विलक्षण प्रेम होते. प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक क्षेत्रात संजीव साने यांनी अनेक अडचणींना तोंड देत कार्य केले आहे; तर आपली भूमिका चोख, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी व्हावी, यासाठी झटणारे किशोर कदम यांनी “सौमित्र’ या टोपणनावाने कसदार कविताही केल्या आहेत.

पंचवीस-तीस वर्षांपूर्वी राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांमध्ये ‘समाजवादी साथी गाती एका आवाजात, ध्येयाचे हे गीत घुमवू अवघ्या अवकाशात’ हे गाणे आवर्जून गायले जाई. सामुदायिक गीत गाताना एखादा कणसूर लागतोच. कधी गमतीने, ठरवून सूर आतबाहेर काढले जातात. भारतातल्या समाजवादी मंडळींचे सामुदायिक गाणे गेल्या तीन दशकांत सूरताल हरवून बसले आहे. साथी विखुरलेत आणि एका नव्हे तर अनेक आवाजात ते गाताहेत. आवाजही घुमत वगैरे नाही, नुसती गुणगुणच काय ती! आणि अवकाश म्हणजे अनंत पोकळी हे वैज्ञानिक सत्यच तेवढे फक्त हाताशी. अशा स्थितीतही जिद्द न हरता वाटचाल करणारे अनेक कार्यकतेर् लोकशाही समाजवादी विचारधारेशी आपले इमान राखून आहेत. संजीव साने हे त्यातील एक अग्रभागी असलेले नाव. केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर देशभरातल्या लोकशाही समाजवादी नि पुरोगामी पक्ष व जनसंघटनांमधला तो दुवा आहे. विविध प्रश्नांवर चालू असलेल्या आंदोलनांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे साह्य सतत लागत असते. मोर्च्यासाठी गावागावांतून आलेल्या लोकांच्या राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेपासून ते आंदोलकांच्या जामिनाची रक्कम भरण्यापर्यंत आणि सुसूत्र समन्वयापासून ते मागण्यांच्या पाठपुराव्यापर्यंत असंख्य कामे सानेंसारख्या कार्यक्षम कार्यर्कत्याची वाट पाहत असतात. ते स्वत: समाजवादी जनपरिषद या संघटनेचे पदाधिकारी आहेत. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे कामही ते पाहतात. साने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते समाजवादी जनपरिषद हा राजकीय पक्ष आहे. मात्र पैसा, मनगटशाही आणि जातपात यावर आधारलेले प्रचलीत राजकारण आणि राजकीय पक्ष यांची एकशतांशही लागण या ‘पक्षा’ला झालेली दिसत नाही. आजच्या राजकीय पटावर अशा संघटनांचा राजकीय पक्ष होण्याची प्रक्रिया ही वाळू रगडून तेल काढण्याइतकी दुरापास्त आहे. राजकारणाचे अर्थ, संदर्भ आणि मार्ग कमालीच्या वेगाने बदलले असताना १९५०च्या जमान्यातल्या राजकीय वाटा बुजल्या तर नवल नाही. अशा वाटांवरून वाटचाल करणे हे त्यामुळेच अनेकदा जागच्या जागी फिरणे ठरते. अशा परिस्थितीत कार्यर्कत्यांचे मनोबल टिकवणे, अवघड वाटचालीवरील त्यांचा विश्वास अढळ ठेवणे, कोणताही ऐहिक लाभ मिळणे शक्य नसताना त्यांच्यातील बंधुभाव जागा ठेवणे ही कुशल संघटकाची कसोटी असते. सानेंना मात्र ते आपले कर्तव्य वाटते. कामगार नेते वि. न. तथा अण्णा साने आणि सामाजिक कार्यर्कत्या यमूताई साने अशा कार्यर्कत्या आईवडिलांचा वारसा त्यांच्यामागे संजीव साने यांनी चालू ठेवला आहे. भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या सानेंना गळाही लाभला आहे. सामुदायिक स्फूतिर्गीतेच नव्हेत, तर गुलाम अलींच्या गझलाही ते नजाकतीने पेश करतात. निळू फुलेंसारख्या प्रखर जाणीवा असलेल्या प्रगल्भ अभिनेत्याच्या नावे असलेल्या सामाजिक पुरस्कारासाठी झालेली त्यांची निवड अशी अनेक अर्थांनी सार्थ म्हणायला हवी.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स : १० एप्रिल २०१०)

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले 79 व्या जयंतीनिमित्त आज हा पुरस्कार प्रदान सोहळा प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडला. त्या सोहळ्याला उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अभिनेते ओम पुरी, अशोक सराफ, डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, “फडणीस ग्रुप’चे विनय फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक, लोकसंगीत तसेच चित्रपट व नाट्य या तीन माध्यमांत उत्तम कामगिरी करणाऱ्या अनुक्रमे संजीव साने, यमुनाबाई वाईकर आणि किशोर कदम यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन; तर अन्य मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

लग्न जुळविण्यासाठी आधुनिक कुंडली

ही आहे आधुनिक कुंडली, शास्त्र-शुद्ध पायावर आधारलेली. सुगावा परिवार, लोकविज्ञान मंडळ आणि प्रतिबिंब मिश्र विवाह मंडळासारख्या अनेक प्रगत विचारांच्या संस्थानी या कुंडली चा जोमाने पुरस्कार केला आहे. लग्न जुळविताना राहू, केतू, मंगळ अशा भ्रामक घटकांना महत्त्व न देता खालील गोष्टीवर भर दिला जावा, असे आमचे ठाम मत आहे, आपल्याला काय वाटते ?

साने गुरूजींविषयी पु.ल.

अमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग.

आभार – दिपक

“ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे. `ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा! तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!’ केशवसुतांचा `नवा शिपाई’ मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खर्‍या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणार्‍यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दांत बोलायचे म्हणजे-

तुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी
नाही तरी गोष्टी बोलू नये

अशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं , पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाने किती सुंदर दर्शन घडते. झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऎवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती? गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला? मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का? जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो…”

पु.लंचा कंठ दाटुन आला होता. डोळ्यांत गुरुजींचेच अश्रू दाटुन आले होते. पु.लंनी स्वत:ला सावरलं. “शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी `ऊठवू सारे रान आता पेटवू सारे रान’ म्हणणारा, स्त्रियांची गाणी, लोकगीतं दारोदार, खेडोपाडी फिरून माताबहिणींमधली कविता सुखदु:ख वेचून घेणारा, त्यांच्या दु:खांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंत:करणातली बंद कवाडं खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्रभूमीत राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोलबोलता नाहिसा झाला.”